चित्रदुर्ग - गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपीवर दाखल केलेला खटला वर्षानुवर्षे चालून मग त्याला शिक्षा सुनावली जाण्याची असंख्य उदाहरणे आहेत. पण कर्नाटकात मात्र यासंदर्भात काही आगळे घडले आहे. ७५ वर्षे वयाच्या वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर अवघ्या अकरा दिवसाच्या आत या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल लागून या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.येथील वलसे गावातल्या परमेश्वरस्वामी या वयोवृद्धाने आपली पत्नी पुतम्मा (६३ वर्षे) हिची २७ जून रोजी हत्या केली होती. या घटनेनंतर अकरा दिवसांनी म्हणजे शनिवारी सदर खटल्याचा निकाल लागून चित्रदूर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. वस्त्रमुत्त यांनी परमेश्वरस्वामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. इतक्या त्वरेने निकाल देण्याची घटना कर्नाटकात प्रथमच घडली आहे असे चित्रदूर्गचे पोलीस अधिक्षक श्रीनाथ जोशी यांनी सांगितले.मुलाने दिली महत्त्वाची माहितीपत्नीची हत्या केल्यानंतर अवघ्या सहा तासांत परमेश्वरस्वामीला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसांत तपास पूर्ण करुन सबळ पुराव्यांनिशी त्याच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परमेश्वरस्वामीचा मुलगा गिरीश याने या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली होती.
गुन्हा घडल्यानंतर अकरा दिवसांत आरोपीला शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:35 AM