नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आलं नाही आणि आता कोरोना मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जातेय ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन-तीन नातेवाईकांनी त्यासाठी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर रुग्णांकडे पाठ फिरवणारे नातेवाईक आता मात्र मदत मिळावी म्हणून कायदेशीर बाबी करण्याची खटपट करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात अनेक समस्या निर्माण होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पारू येथील एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग आपल्याला देखील होईल या भीतीने कोणीही साधं त्यांना रुग्णालयात पाहायला देखील आलं नाही किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूरसही केली नाही.
वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईक पुढे आले नाही. पण आता कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मिळणारी मदत मागण्यासाठी मात्र कुटुंबीयामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. वृद्धाच्या पत्नीचं देखील निधन झालं आहे. त्याला तीन मुलं आणि मुली आहेत. त्या तिघांनीही आता मृत्यूनंतर मिळणाऱ्या मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला अशा स्वरुपाची मदत मिळते. मात्र हे दोघेही नसल्यास पुढच्या पीढीला म्हणजेच त्यांच्या मुलांना ही रक्कम मिळते. त्यामुळे मृत्यूनंतर आता मुलांनी मदतीसाठी हात पसरले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे. आरोग्यविषयीच्या या समस्यांमुळे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व्हायरस हा फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर न्यूरोलॉजिकल समस्या देखील असल्याचं डॉक्टर बक्शी यांनी म्हटलं आहे.