नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एका महिलेने आपला पती गमावला आहे. पण यानंतर तिने हार न मानता, परिस्थितीसमोर खचून न जाता या परिस्थितीचा धीराने सामना केला आहे.
पतीच्या मृत्यूनंतर घरची परिस्थिती आणखी बिघडली. मुलांचं, कुटुंबियांचं पोट भरणं देखील अवघड झालं. अशावेळी महिलेने ई-रिक्षा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आता मुलांचा सांभाळ करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या छपरा जिल्ह्याचे रहिवासी असलेले रंजन गिरी हे आपल्या पत्नी आणि मुलांसह 12 वर्षांपूर्वी फरीदाबाद येथे आले होते. ते रिक्षा चालवायचे. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी एक ई-रिक्षा घेतली आणि ती चालवून ते कुटुंबाची जबाबदारी घेत होते. त्याचवेळी त्यांची पत्नी ममता देवी एका फायबर कंपनीत नोकरी करत होती.
नोकरी मिळत नसल्याने ई-रिक्षा चालवण्याचा घेतला निर्णय
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये पत्नीची नोकरी गेली. तसेच रंजन गिरी यांना देखील कोरोनाची लागण झाली. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूने ममता देवी यांना मोठा धक्का बसला. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही आता त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी हार नाही मानली. काहींनी त्यांना मदत केली. पण दुसऱ्याच्या मदतीवर किती दिवस अवलंबून राहणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला म्हणून त्यांनी स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. तसेच नोकरी मिळत नसल्याने त्यांनी ई-रिक्षा चालवण्याचा मोठा निर्णय घेतला. पण हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्या ई-रिक्षा चालवायला शिकल्या आणि आता आपल्या मुलांचं पोट भरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण हार नाही मानली; रिक्षा चालवून 'तो' देतोय मुलांना शिक्षण
आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी धडपड आणि अपार कष्ट करणाऱ्या एका बापमाणसाची गोष्ट समोर आली आहे. घर तुटलं, पत्नी सोडून गेली पण त्याने हार नाही मानली. रिक्षालाच आपलं घर बनवून तो आता मुलांना शिक्षण देत आहे. गणेश साहू असं या 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ज्यांच्याकडे आपल्या मुलांसाठी डोक्यावर छप्पर नाही पण तरीही ते आपल्या मुलांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी झटत आहेत. आपल्या मुलांचं पालनपोषण करता यावं, त्यांचं पोट भरता यावं म्हणून ते रिक्षा चालवण्याचं काम करतात. यासोबतच मुलांना देखील स्वत:च शिकवतात. भास्कर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, गणेश साहू यांना दोन मुलं आहेत. ते आधी एका छोट्याशा झोपडीमध्ये राहत होते. मात्र अतिक्रमणामध्ये त्यांची झोपडी तुटली. ज्यानंतर ते बेघर झाले. आता रिक्षाच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे.