लहान वयात काही अडचणींमुळे अनेकांवर कुटुंबाची जबाबदारी येते. अशीच एक डोळे पाणावणारी गोष्ट समोर आली आहे. राजस्थानच्या मोहनपूरा गावात वडिलांच्या मृत्यूनंतर एक पगडी विधी पार पडला. जे पाहून सर्वच जण अत्यंत भावूक झाले. पंच पटेलांनी तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावर फेटा बांधला तेव्हा उपस्थितांसह ते स्वतःही भावूक झाले. खेळण्याच्या वयात लेकीवर कुटुंबाची जबाबदारी आली आहे. मोहनपूरामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर पंच पटेलांनी तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्यावर पगडी बांधून तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी सोपवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहनपूरामधील सुनिल टोडावता यांचं आकस्मिक निधन झालं. त्यांना मुलगा नसून एकुलती एक तीन वर्षीय अनम नावाची मुलगी आहे. याच कारणामुळे पंच पटेलांनी या विधीसाठी अनमलाच बसवलं. यानंतर समाजातील लोकांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विधी पार पाडला.
राजस्थान सरपंच संघाचे अध्यक्ष बंशीधर गढवाल, अनमचे आजोबा रामफूल शेरावत, माजी नगरसेवक गीता चौधरी शेरावत, माजी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बागरू अशोक शेरावत, रामलाल शेरावत, जगदीश शेरावत, आजोबा रामपाल हरलाल रामकरण नंदाराम, प्रभुदयाल आणि नागपाल टोडावता आदी उपस्थित होते.
ही एक सामाजिक प्रथा आहे ज्याचे पालन हिंदू, शीख यांच्यासह सर्व धार्मिक समुदाय करतात. या प्रथेनुसार, कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर, पुढच्या सर्वात मोठ्या मुलाच्या डोक्यावर विधीपूर्वक पगडी बांधली जाते. पगडी हे या भागातील समाजात आदराचे प्रतीक आहे, हे यातून दिसून येतं. ज्याच्या डोक्यावर पगडी बांधली जाते, तो व्यक्ती कुटुंबाच्या सन्मानाची आणि कल्याणाची जबाबदारी घेतो. पगडीचा विधी अंत्यसंस्कारानंतर चौथ्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी केला जातो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.