रांची - आई-वडिलाच्या मृत्यूनंतर अनाथ बनलेल्या ५ मुलांची भेट घेऊन तीन मुलांचा शाळेत दाखला करण्याचं काम महाराष्ट्राचे सुपुत्र आणि कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी केलंय. कोरडमा शहरातील छोटगी बागी वार्ड नंबर १ मधील एका गरीब कुटुंबातील मालती या महिलेचे निधन झाले. अगोदरच वडिलांचे निधन झाले होते. आता, आईही सोडून गेली. त्यामुळे या कुटुंबातील ५ मुलांसमोर जगण्याचा, भविष्याचा प्रश्न पडला होता. मात्र, कोडरमाचे संवेदनशील जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी तात्काळ पीडित कुटुंबाला भेट देऊन या पाचही मुलांची प्रशासनाच्या वतीने जबाबदारी घेतली.
पाच वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर, जंगलातून लाकडं आणून आपला उदरनिर्वाह भागवणारी, आपल्या ५ मुलांचा सांभाळ करणाऱ्या मालतीचे निधन झाले. त्यामुळे, घरातील मोठे असलेल्या १८ वर्षीय मानिसकदृष्ट्या कमकुवत असलेला मुलगा अन् ९ वर्षीय मुलाच्या जीवनातही अंधकार निर्माण झाला होता. आईचा आधार गेल्याने एकाच कुटुंबातील ५ मुले निराधार बनले होते. याबाबत, कोडरमाचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांना माहिती मिळताच पीडित कुटुबींयाच्या घरी जाऊन ते या चिमुकल्यांचा आधार बनले. घोलप यांनी स्वत: पालक बनून कुटुंबातील तीन मुलांचा कस्तुरबा बालिका निवासी विद्यालयात प्रवेश घेतला. काजलकुमारी १५ वर्षे, सुनिता कुमारी १३ वर्षे आणि अनिता कुमारी ११ वर्षे यांना इतर शालेय साहित्य व कपडेही देऊ केले.
निराधार बनलेल्या तीन मुलींना सनदी अधिकारी रमेश घोलप यांच्यामुळे सुरक्षेसह शिक्षणाचा आधार मिळाला आहे. घोलप यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी व स्वताकडून पीडित कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत केली. तसेच, राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजनेतून २० हजार रुपयांचा लाभही दिला. या पीडित कुटुंबातील तीन मुलांना बाल संरक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा २००० रुपये मदत मिळेल, अशी व्यवस्थाही घोलप यांनी केली आहे.