मुंबई - हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केलेल्या चार आरोपींच्या एन्काउंटरची मीडियात चर्चा होत आहे. सोशल मीडियातून तेलंगणा पोलिसांवर कौतुकांची फुले वाहिली जात होती. तर, त्याचवेळेस दुसरीकडे उन्नाव बलात्कार पीडितेला न्यायालयात जात असताना पेटवून देण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ उडविली होती. या पिडीतेचा शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर, रुग्णालयाबाहेर उन्नावमधील या दुष्कर्माविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलीवर पेट्रोल टाकून जळविण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार आज घडला असून तैनात पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि सहा वर्षीय मुलीला आपत्कालीन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
उन्नावमधील खळबळजनक घटनेतील पीडित तरुणीचा सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर आज या रुग्णालयाबाहेर एक महिला आंदोलन करत होती. दरम्यान, या आंदोलनकर्त्या महिलेने आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून जळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे मुलीचा जीव वाचला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. काल रात्री उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री १०.४० वाजताच्या सुमारास पीडितेचे निधन झाले. तिला एअरलिफ्ट करत दिल्लीला हलविण्यात आले होते. ९० टक्के भाजलेली असूनही ती शुद्धीत होती. यावेळी तिने तिच्यासोबत असलेल्या भावाला मी वाचणार ना? मला मरायचे नाही, असे अश्रू ढाळत सांगितले होते.