नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) भाजपाच्या (BJP) पराभवानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि बंगालचे माजी भाजपा अध्यक्ष तथागत रॉय (Tathagat Roy) यांनी ट्वीट केलेल्या एका फोटोमुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. तथागत रॉय यांनी भाजपाचे पश्चिम बंगालमधील प्रभारी कैलास विजयवर्गीय (BJP Kailash Vijayvargiya) यांची तुलना श्वानाशी केल्यामुळे हा नवा वाद आता निर्माण झाला आहे. तसेच रॉय यांनी हा फोटो ट्वीट करताना "वोडाफोन इन वेस्ट बंगाल अगेन" म्हणजेच "पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा व्होडाफोन" असं कॅप्शन दिलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये इतका मोठा पराभव झाल्यानंतरही कैलास विजवर्गीय भाजपाचे प्रभारी आहेत याबद्दल एका युजरने म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना तथागत रॉय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा एक फोटो ट्वीट केला आहे. "गर्दीतील नेते असणाऱ्या कैलास विजयवर्गीय यांचा अद्याप कोणीही उल्लेख केलेला नाही. वरिष्ठ नेत्यांसोबत असणाऱ्या घनिष्ठ सबंध कदाचित त्यांना वाचवत आहेत. आश्चर्य म्हणजे ते अद्यापही भाजपाचे प्रभारी आहेत. भाजपा कोलकात्यात अद्यापही दिशाहीन आहे" असं युजरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
"पंतप्रधान, गृहमंत्र्यांचं नाव चिखलातून ओढत नेत मोठ्या पक्षाची बदनामी केली"
पश्चिम बंगाल निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला. टीएमसीने 294 पैकी 213 जागांवर विजय मिळवत भाजपाला मोठा धक्का दिला. भाजपा फक्त 77 जागांवर विजय मिळवू शकली. या पराभवासाठी तथागत रॉय यांनी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासहित कैलास विजयवर्गीय, शिवप्रकाश आणि अरविंद मेनन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. या चौघांनी मिळून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं नाव चिखलातून ओढत नेत सर्वात मोठ्या पक्षाची बदनामी केली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसेच तृणमूलमधून येणाऱ्या कचऱ्याला ते सेव्हन स्टार हॉटेलमध्ये बसून तिकीट वाटत होते असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.