नवी दिल्ली : स्थानिक पक्षांनीच भाजपला पराभूत करावे, अशी आपली भूमिका असेल, तर दिल्ली प्रदेश काँग्रेसची गरजच काय, अशा प्रश्न विचारून महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्वपक्षातील खदखद व्यक्त केली. पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाच सुनावले. भाजपला पराभूत करण्याचे काम आता इतर पक्षांवर सोपविले आहे काय, असा प्रश्न विचारून मुखर्जी यांनी वाद निर्माण केला. पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुभाष चोप्रा व प्रभारी पी.सी. चाको यांनी आपले राजीनामा दिले. पक्षांतर्गत धुसफुस मात्र त्यामुळे शमली नाही. चिदंबरम यांनी आपच्या विजयाचे स्वागत केले. खोटारड्यांना पराभूत केल्याबद्दल चिदंबरम यांनी आपचे अभिनंदन केले होते. त्यांच्या प्रत्युत्तरात मुखर्जी यांनी पक्षाची स्थितीच कथन केली. भाजपचा पराभव करण्यासाठी जर इतरांचीच मदत घ्यायचे ठरविले असेल, तर प्रदेश काँग्रेसच बरखास्त करावी, अशा शब्दात मुखर्जींनी सुनावले.आपला सरळ ‘पास’दिल्लीत काँग्रेस मैदानातच नव्हती. आपला सरळ ‘पास’ दिल्याची टीका आता सुरू झाली. सात वर्षांत तीनदा विधानसभा व दोनदा लोकसभा निवडणूक झाली. काँग्रेसने पराभवाचे नवे विक्रम रचले. त्यामुळे पक्षात नाराजी आहे. दिल्लीबाबत निर्णय घेण्यात पक्षाच्या नेत्यांनी विलंब केला. आपच्या रणनीतीवरून भूमिका ठरविली. त्याचा फटका काँग्रेसला बसला, अशी उमेदवारांची, कार्यकर्त्यांची भावना आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ०.०२ टक्के मतेराष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाच जणांना उमेदवारी दिली होती. त्यात आपने तिकीट नाकारलेल्या दोघांचा समावेश होता. मात्र, एकाही उमेदवाराला विजय मिळाला नाही. त्या पक्षाला केवळ ०.०२ टक्के मते मिळाली.आपने उमेदवारी नाकारल्याने आमदार सुरेंद्र सिंग यांनी दिल्ली कॅन्टॉन्मेंट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविली. त्यांना फक्त ९०४ (१.५४ टक्के) मते मिळाल्याने ते सहाव्या स्थानी फेकले गेले. तेथे हवाई दलाचे माजी अधिकारी आणि आपचे उमेदवार वीरेंद्र सिंग विजयी झाले. छत्तरपूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राणा सुजित सिंग यांना १७७ मते (०.१३ टक्के) मिळाली. ते आठव्या क्रमांकावर राहिले व आपचे विद्यमान आमदार करतार सिंग तन्वर विजयी झाले. बाबरपूरमध्ये राष्ट्रवादीचे झहिद अली १५० मते (०.११ टक्के) मिळवून आठव्या क्रमांकावर राहिले. तेथे आपचे आमदार आणि रोजगारमंत्री गोपाल राय पुन्हा विजयी झाले.