भोपाळ - लोकसभा निवडणुकांवेळी वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्या विजयाबद्दल भाकित केले होते. तसेच, जर दिग्विजयसिंह याचा पराभव झाला, तर मी जलसमाधी घेईल, अशी शपथही मिर्ची बाबा यांनी घेतली होती. त्यामुळे, दिग्विजय सिंहांच्या पराभवानंतर आपला शपथसंकल्प सोडण्यासाठी ते तलावावर गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना जलसमाधी घेण्यास मनाई केली.
मिर्ची बाबा यांनी गुरुवार 14 जुन रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून जलसमाधीस परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यामध्ये, 16 जुन रोजी दुपारी 2.11 वाजता मी जलसमाधी घेत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, आणखी एक पत्र लिहून जलसमाधीवेळी सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याचे म्हटले. मात्र, भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण कुमार पिथोडे यांनी मिर्ची बाबा यांच्या विनंती पत्राला हरकत घेत, ही परवानगी नाकारली आहे. तसेच, पोलिसांना बाबांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. भोपाळमधील शितलदास की बगिया या तलावावर पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. मिर्ची बाबा हॉटेलमधून निघाण्यापूर्वीच त्यांना तलावावर जाण्यास मनाई करण्यात आली. पोलिसांनी हॉटेलवरच बाबांना नरजकैदेत ठेवले आहे. त्यामुळे, जलसमाधीचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा उद्देश फसला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी दिग्विजयसिंह यांच्या विजयासाठी मिर्ची बाबांनी यज्ञ केला होता. त्यावेळी, सिंह यांचा निश्चितच विजय होईल, असे भाकित त्यांनी केले होते. तसेच, सिंह याचा पराभव झाल्यास मी जलसमाधी घेईन, असेही मिर्ची बाबांनी म्हटले होते. त्यानुसार, 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालात दिग्विजय सिंह यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे. भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिग्विजय सिंह याचा तब्बल 3.64 लाख मतांनी पराभव केला आहे.