लखनऊ - लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वत: अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. जर अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला भोपळा मिळाला आहे. 2014 च्या तुलनेत यंदा मोदीलाट नाही,त्यामुळे विरोधकांना चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र सगळ्यांचे अंदाज चुकले. पुन्हा एकदा आणखी दमदार पाऊलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलं आहे.
काँग्रेसच्या या पराभवानंतर पक्षातंर्गत मोठी हालचाल समोर येत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभवाची जबाबदारी घेत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे. तर ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये निराशाजनक कामगिरी राहिल्याने प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीदेखील राजीनामा दिला आहे.
उत्तर प्रदेशात रायबरेली सोडून एकही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही. प्रदेशाध्यक्ष राज बब्बरही निवडणुकीत हारले. मुरादाबाद लोकसभेची तिकीट नाकारल्यानंतर राज बब्बर यांना फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र भाजपाच्या राजकुमार चाहर यांनी राज बब्बर यांचा पराभव केला.
राज बब्बर यांनी ट्विट करत सांगितले की, जनतेचा विश्वास जिंकून विजय प्राप्त करणाऱ्यांचे अभिनंदन, यूपीत काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. माझी जबाबदारी असताना यश प्राप्त न झाल्याने मी दोषी आहे. त्यामुळे मी नेतृत्वाची भेट घेईन.लोकसभा निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत जनतेने दिलेला कौल मान्य केला आहे. मात्र निकालानंतर राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला असल्याची चर्चा आहे. तसेच महाराष्ट्रातही काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडमधून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे अशोक चव्हाणही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे.