तिरुवनंतपुरम - उत्तम अन्नपदार्थ तयार करण्यात यशस्वी झाल्यानंतर आता कैदी पेट्रोल पंप चालविणार आहेत. केरळ सरकारने ही अभिनव योजना आखली आहे. तमिळनाडू आणि पंजाबच्या कारागृहांकडून प्रेरणा घेऊन केरळमधील कारागृहाने अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. केरळमधील तीन मध्यवर्ती कारागृहांच्या बाहेरील बाजूस पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत. काही निवडक कैद्यांकडून ते चालविले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन' (आयओसी) तर्फे कारागृह प्रशासनाने निवडलेल्या जागांवर हे पेट्रोल पंप उभारले जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पेट्रोलपंपासाठी किमान 15 कैद्यांची निवड केली जाणार आहे. काम करण्यासाठी त्याच्या शिफ्ट ठरवल्या जातील. तसेच पेट्रोल पंप चालविण्याचे योग्यरित्या प्रशिक्षण दिले जाणार आहे. कारागृह प्रशासनाच्या नियमांनुसार पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कैद्यांना वेतन दिले जाणार आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती कारागृहाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कारागृह डीजीपी ऋषिराज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सरकारी परवानग्या मिळालेल्या आहेत. तिरुवनंतपुरम येथील पूजाप्पुरा, थ्रिसूर जिल्ह्यातील विय्युर आणि कन्नूर येथील मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. 'ऑनलाइन फूड' ला मिळणारा प्रतिसाद पाहून केरळ कारागृह प्रशासनाने कैद्यांनी बनविलेले पदार्थ विकण्यास याआधी सुरुवात केली आहे. 'फ्रीडम फूड फॅक्टरी' नावाने स्वादिष्ट पदार्थ ऑनलाईन विकले जात आहेत. कारागृहातील कैद्यांनी बनविलेली चपाती, चिकन करी आणि बिर्याणी येथे विकली जाते. त्यानंतर आता कैदी पेट्रोल पंप चालविणार आहेत.