कानपूर : सेल्फी घेण्याच्या नादात सात युवक गंगेत बुडाल्याच्या घटनेनंतर, जिल्हा प्रशासनाने अशा दुर्घटना होऊ नयेत, यासाठी नदीच्या बॅरेजवर कठडे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बंधाऱ्यावर पोलीस तैनात करण्यात आले असून, त्याच्या उताराच्या पुढे जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. छायाचित्र घेताना लोकांना नदीच्या खूप जवळ जाता येऊ नये, यासाठी कठडे उभारण्यात येणार असून, त्यासाठी सिंचन विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. बंधाऱ्यावर तैनात पाणबुड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. एका तरुणाचा सेल्फी घेण्याचा नाद त्याच्यासह त्याच्या सहा मित्रांसाठी जीवघेणा ठरला. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात सर्व जण नदीत बुडाले. बुधवारी ही भयंकर दुर्घटना घडली. हे युवक पावसानंतर नदीत स्नानासाठी गेले होते. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
सात युवक बुडाल्यानंतर गंगा बॅरेजवर कठडे
By admin | Published: June 24, 2016 12:22 AM