संजय शर्मा -नवी दिल्ली : कर्नाटकच्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप अजून सावरलेला नसताना देशभरात मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी करावी लागत आहे. ३० आणि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या विशेष जनसंपर्क अभियानाचे उद्घाटन एका मोठ्या सभेला संबोधित करून करणार आहेत.कर्नाटकच्या पराभवाच्या धक्क्यातून भाजप अद्याप सावरलेला नाही, मात्र आज भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावून ३० मे ते ३० जूनदरम्यान होणाऱ्या मॅरेथॉन आयाेजनांची यादी जाहीर केली. यानिमित्ताने भाजप देशभरात विशेष जनसंपर्क अभियान राबवणार आहे.सर्वांत मोठी जनसंपर्क मोहीम३० आणि ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान या निवडणूक राज्यांमध्ये सभा घेऊन भाजपच्या सर्वांत मोठ्या जनसंपर्क मोहिमेची सुरुवात करणार आहेत. ३० मे रोजी ते स्वतः कामगारांना संबोधित करणार आहेत.भाजपचे नेते देशभरात ५१ ठिकाणी जाहीर सभा घेऊन मोदी सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला सांगतील. त्यानंतर भाजपचे केंद्रीय नेते देशातील ३९६ लोकसभा मतदारसंघांत संमेलन घेणार आहेत. जनसंपर्क अभियानांतर्गत लोकांचीही भेट घेणार आहेत.
लोकसभेची तयारी...महिनाभर चालणाऱ्या या सोहळ्यात भाजप २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीची रंगीत तालीमही करणार आहे. जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री देशातील एक लाख प्रतिष्ठित कुटुंबांच्या घरांना भेटी देतील आणि त्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन करतील. या काळात भाजप नेते देशातील सुमारे २५० मोठे खेळाडू, उद्योगपती, कलाकार आणि व्यावसायिकांना भेटणार आहेत.मोहिमेसाठी बैठका२९ मे रोजी सर्व राज्यांचे भाजप नेते राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लोकांवर प्रभाव टाकणाऱ्यांना भेटतील. २३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या १० लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या मोहिमेच्या तयारीसाठी १६ ते १९ मेदरम्यान सर्व राज्यांमध्ये राज्य कृती समित्यांच्या बैठका होणार आहेत.