थंड वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या हिमालयातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. हिमालयीन भागातील सीमेवर चीन आणि भारतीय सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या भागात भारत-पाकिस्तान सीमेप्रमाणे गोळीबार होत नसला, तरीही हिमालय परिसरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले आहे. देशभरात उन्हाच्या झळा वाढत असताना भारत-चीन सीमेवरील तणावदेखील वाढतो आहे. भारत आणि चीनची सीमारेषा 4 हजार 57 किलोमीटरची आहे. या सीमेवरील जवळपास 23 ठिकाणं अतिशय संवेदनशील समजली जातात. या भागांमध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर असणाऱ्या डोकलाम परिसरात भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव 73 दिवसांनंतर संपुष्टात आला होता. डोकलाम प्रकरणानंतर दोन्ही देशांनी सीमावर्ती भागातील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. चिनी सैन्याने भूतानच्या उत्तर डोकलाम भागावर कब्जा केला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. या भागात चीनने बंकर, रस्ते आणि हॅलिपॅडची उभारणी केली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात भारत आणि चिनी सैन्यात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. 'आम्ही चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली आहे. सीमेवरील पेट्रोलिंगमध्येही वाढ करण्यात आली आहे,' अशी माहिती 2 इन्फट्री माऊंटन डिव्हिजनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 2 इन्फट्री माऊंटन डिव्हिजनकडे 386 किलोमीटर सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. चिनी सैन्याकडून होणारी घुसखोरी लक्षात घेता भारतीय सैन्याकडूनही आक्रमकपणे पावले उचलली जात आहेत. पश्चिम (लडाख), मध्य (उत्तराखंड, हिमाचल) आणि पूर्व (सिक्कीम, अरुणाचल) या तिन्ही भागांमध्ये भारतीय सैन्याकडून मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
सीमेवरील वातावरण तापलं; चीनच्या लष्करी हालचाली वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 10:59 AM