नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या हरयाणामध्ये प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यानच राहुल गांधी यांनी मुलांसोबत क्रिकेट घेण्याचा आनंद लुटला आहे. शुक्रवारी (18 ऑक्टोबर) खराब हवामानामुळे राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींग करावं लागलं. एका कॉलेजच्या मैदानात हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं. त्याचवेळी तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. मुलांना खेळताना पाहून क्रिकेट खेळण्याचा मोह राहुल गांधींनाही आवरला नाही. त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी शुक्रवारी महेंद्रगड येथे गेले होते. तेथे प्रचारसभेला संबोधिक केल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला येण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. त्याचवेळी खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. एका कॉलेजच्या मैदान हेलिकॉप्टर उतरवावे लागले. त्यावेळी काही मुलं तिथे क्रिकेट खेळत होती. राहुल गांधी यांनी देखील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी बॅटींग करताना दिसत आहेत.
हरयाणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्षांचेही प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचीही हरयाणातल्या नूंह जिल्ह्यात प्रचारसभा झाली. राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या मोदी आणि खट्टर हे फक्त खोटी आश्वासनं देत सुटले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार, शेतकरी कल्याण आणि रोजगाराची आश्वासनंही फसवी असल्याचं म्हटलं आहे.
तसेच भाजपाबरोबरच त्यांनी संघावरही निशाणा साधला आहे. काँग्रेस सर्वांचा पक्ष आहे, तो जनतेला जोडायचं काम करतोय, तर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांसारखं देश तोडायचं काम करतायत. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये केलेल्या कामांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, देशात तरुणांना बेरोजगारीचा फटका बसतो आहे. मोदी एकावर एक खोटी आश्वासनं देत आहेत. मोदी दर दहाव्या दिवसाला मन की बात करतात, तर मी विचार केला मग आपण त्याऐवजी काम की बात करू, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.