बंगळुरू - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाच कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेस नेते रोशन बेग यांनी पक्षातील सहकारी नेते सिद्धारामय्या, के. सी. वेणुगोपाल आणि दिनेश गुंडू राव यांच्यावर गंभीर टीका केली आहे. कर्नाटकमध्ये भाजपाला 18 हून अधिक जागा मिळतील आणि याला सिद्धारामय्या कारणीभूत असतील, असा आरोप बेग यांनी केला आहे. तसेच पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची जोकर अशी संभावना त्यांनी केली आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन आघाडी सरकार स्थापन केले होते. मात्र स्थापनेपासूनच हे सरकार अस्थिर आहे. आता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये असंतोष आणि बंडखोरी उफाळून आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी आपल्या पक्षसहकाऱ्यांवर गंबीर आरोप केले आहे. '' कर्नाटकमध्ये भाजपाला 18 हून अधिक जागा मिळतील आणि याला सिद्धारामय्या कारणीभूत असतील, सिद्धारामय्या यांनी लिंगायत समाजाला पक्षापासून तोडले. आता आपले नाक कापून घेण्याशिवाय कुठलेही काम उरलेले नाही. सिद्धारामय्या यांनीच कर्नाटक सरकारला संकटात टाकले आहे. सरकार चालावे आणि कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदी राहावेत, अशी सिद्धारामय्या यांची इच्चा नाही,''असा आरोप रोशन बेग यांनी केला.
लोकसभा निकालांपूर्वीच कर्नाटक काँग्रेसमध्ये 'कल्ला'; नेत्यांमध्ये जुंपली, आरोपांच्या फैरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 1:50 PM