मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला असताना सट्टाबाजारही तेजीत आला आहे. निवडणुकीनंतर देशात कोणाची सत्ता येईल इथंपासून राज्यात कोणत्या पक्षाचा बोलबाला असेल यावर सध्या सट्टा लावला जातो. आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला असून परवापर्यंत हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
सट्टाबाजारात सध्या केंद्रात एनडीएला 307 जागांसह बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आली असून यूपीएला 106 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीला 34 ते 35 जागा मिळतील तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 13 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील यावरही मोठ्या प्रमाणात सट्टा लागला आहे.
भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत 251 ते 254 जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीतील भाजपाच्या जागांमध्ये घट होताना दिसतेय. मात्र याचा कोणताही परिणाम सत्ता स्थापनेसाठी होणार नाही. तर मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 40 जागा मिळाल्या होत्या. यात वाढ होऊन यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला 74 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर इतर पक्षांना 129 जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीने कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपाला 43 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या निवडणुकीत हाच आकडा 73 जागांचा होता.
लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर सट्टेबाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. मात्र सट्टेबाजारात पुढील 2 दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण क्रिकेट मॅचप्रमाणे निवडणूक निकालांवर लावलेल्या सट्टाबाजारावर पोलिसांची करडी नजर आहे.