कन्नौज जिल्ह्याच्या ए.आर.टी.ओ इज्या तिवारी यांनी संघर्ष करून घवघवीत यश संपादन केलं आहे. लहान वयातच वडिलांचा मृत्यू झाला आणि आईला मोठा धक्का बसला. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि दिवसरात्र केलेल्या मेहनतीमुळे त्यांनी यश संपादन केलं आहे. मूळच्या लखनौ येथील रहिवासी असलेल्या इज्या तिवारी यांची जिल्ह्यात प्रथमच परिवहन विभागाची महिला अधिकारी म्हणजेच एआरटीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी इज्या तिवारी आठवीत शिकत होत्या. वडिलांच्या आजारपणामुळे सर्व बचत खर्च झाली. एक वेळ अशी आली की आपलीच माणसं सोडून गेली आणि वडिलोपार्जित घरही गेले. भाड्याच्या घरात राहावे लागले. वडील गेल्यानंतर आईची मनस्थिती ठीक नव्हती. घरात जेवणासाठीही पैसे नव्हते. त्यानंतर त्या स्वतः आईचा आधार बनल्या. इज्या तिवारी या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहेत.
इज्या यांनी सांगितलं की, "आयुष्याचे सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. वडील गेल्यानंतर सर्व काही बदललं आणि मला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. आमचे बरेच नातेवाईक आम्हाला सोडून गेले. पण मी हार मानली नाही. ब्राइट लाइन इंटर कॉलेजमध्ये शिक्षक असलेल्या माझ्या गुरूंनी माझ्याकडे पैसे नसतानाही मला मोफत शिक्षण दिलं. मला लिहायला आणि वाचायला आवडायचं. वयाच्या 12 व्या वर्षी माझा संघर्ष सुरू झाला. खूप कष्ट करून बँकेत नोकरी लागली. यानंतरही मी माझा अभ्यास सुरू ठेवला."
"बँकेतून परतल्यावर मी रात्री तासनतास अभ्यास करायची. सुमारे चार वर्षे खूप मेहनत घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. माझं ग्रॅज्युएशन झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर आई खचली, त्यानंतर मी अनेक संकटांना तोंड देत आईची काळजी घेतली. मुलीऐवजी आई बनून आईची सेवा केली. 2014 मध्ये बँकेत नोकरी मिळाल्यानंतरही आईची काळजी घेतली" इज्या यांनी 10 ते 5 नोकरी केल्यानंतर रात्री 9 ते 2-3 या वेळेत मेहनत आणि परिश्रमपूर्वक अभ्यास करून UPPCS ची तयारी सुरू केली. कोणतीही शिकवणी घेतली नाही. त्यानंतर 2018 च्या बॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.