लेह (लडाख) - गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही चिनी सैन्य माघार घेण्याचे संकेत दिसून येत नाही आहेत. सीमेवर सज्ज असलेल्या भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यानंतर आता चीननेलडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केली आहे.
पूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमव सुरू झाली असून, त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात मोर्चा उघडण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
याबाबतचं वृत्त इंडिया टुडे आणि आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या वृत्तानुसार दौलत बेग ओल्डी परिसरात चिनी सैन्याकडून जमवाजमव सुरू झाली आहे. जून महिन्यामध्ये चीनच्या तळाजवळ कॅम्प आणि वाहनांची वर्दळ दिसून आली आहे. चीनने हा तळ २०१६ पूर्वीच बनवला होता. मात्र आता तिथे नवे बांधकाम तसेच वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच जमिनीवरील ट्रॅकिंगमधून याला दुजोराही मिळाला आहे.
दरम्यान, चीन डेपसांग भागात जमवाजमव करू शकतो, याची कुणकुण भारताला मेच्या अखेरीसच लागली होती. तेव्हापासून या भागातील लष्कराची उपस्थिची भक्कम करण्यात आली होती. डेपसांग भागाताच चिनी सैन्याने २०१३ मध्ये घुसखोरी केली होती.
एकीकडे सीमेवर सैन्य आमनेसामने येत असताना दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. सैनिकी स्तरावरील चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशामध्ये राजनयिक स्तरावरील चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे संयुक्त सचिव आज चर्चा करण्य्ची शक्यता आहे. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव करतील. तर चीनकडून डीजी सीमा विभाग या चर्चेत सहभागी होतील. यापूर्वी दोन्ही देशात कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यामध्ये चीन जेव्हा ५ मे रोजी असलेल्या पूर्वस्थितीत जाईल तेव्हाच वाद निवळेल असे स्पष्ट केले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना
गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले
मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर
कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले
भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली