Karnataka Election Result 2023 : मतमोजणीत आघाडी मिळताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, सिद्धारमैय्यांच्या पुत्राने केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 09:47 AM2023-05-13T09:47:12+5:302023-05-13T09:47:46+5:30
Karnataka Election Result 2023 Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यादरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारमैय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारमैय्या यांनी सूचक विधान केलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यादरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारमैय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारमैय्या यांनी सूचक विधान केलं आहे. त्यांनी कर्नाटकच्या हितासाठी माझे वडील सिद्धारमैय्या यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं पाहिजे, असं विधान केलं आहे.
मतमोजणीतील सकाळी ९.४५ पर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस ११२, भाजपा ८६, जेडीएस २३ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, यतिंद्र सिद्धारमैय्या म्हणाले की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काहीही करण्यास तयार आहोत. राज्याच्या हितासाठी माझ्या वडिलांना मुख्यमंत्री बनवलं पाहिजे. कर्नाटकच्या विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झालं होतं. यावेळी प्रचारादरम्यान, सत्ताधारी भाजपा, मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत होती. मात्र आता जनतेने कर्नाटकच्या सत्तेच्या किल्ल्या कुणाच्या हातात सोपवल्या आहेत, हे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते सिद्धारमैय्या आणि डी.के. शिवकुमार तसेच जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा ३८ वर्षांची परंपरा तोडून सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसला सत्तांतर घडवून आणण्याबाबत पूर्ण विश्वास आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये दणदणीत विजय मिळाल्यास या विजयाचा पुरेपूर वापर २०२४ च्या लोकसबा निवडणुकीपूर्वी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी करता येईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. मतमोजणीतील सकाळी ९.४५ पर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेस ११२, भाजपा ८६, जेडीएस २३ आणि इतर ३ जागांवर आघाडीवर आहेत.