नवी दिल्ली : राजस्थानमधील जोधपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नववधूने लग्न लागताच आंदोलनस्थळ गाठून सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर तिने हनिमूनला जाणे टाळले आणि आंदोलनात सहभाग नोंदवला. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे तिने यावेळी सांगितले. ही अनोखी घटना जोधपूर जिल्ह्यातील फलौदी कस्बे येथील असून हे आंदोलन मागील 23 दिवसांपासून सुरू आहे.
दरम्यान, इथे जवळपास 3 आठवड्यांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला फलौदी येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले होते. इथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला जोधपूर येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने जखमी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाला. फलौदी रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. इथे किरकोळ अपघातानंतर देखील पीडितांना जोधपूरला रवाना केले जाते. त्यामुळे काहींना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. 18 जानेवारी रोजी ललित रंगा उर्फ ललित हिंदू या तरूणीने जिल्हा रुग्णालयातील कारभार सुधारण्याच्या मागणीसाठी फलौदी येथे आंदोलन सुरू केले होते.
27 जानेवारीला झाले होते लग्न तर, 27 जानेवारीला ललित हिंदू या तरूणीचे लग्न होणार होते. लग्नाचा कार्यक्रम लक्षात घेऊन ललितच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. 27 जानेवारी रोजी विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे विवाह मंडपातून उठून आंदोलनस्थळ, जयनारायण व्यास सर्कल येथे पोहोचले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा नवदाम्पत्याने दिला आहे. आता याप्रकरणी गुरुवारी फलौदी बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"