गुलाम नबी यांच्यानंतर कर्ण सिंगही होणार ‘आझाद’? म्हणाले, “माझा कोणताही संबंध नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 03:19 PM2022-09-16T15:19:09+5:302022-09-16T15:19:46+5:30
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाची साथ सोडली होती. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाची साथ सोडली होती. त्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसला आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. महाराजा हरी सिंग यांचे सुपुत्र आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंग यांनी आता काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. मी १९६७ मध्ये काँग्रेससोबत आलो होतो. परंतु सध्या माझं नातं जवळपास नसल्यासारखंच आहे, असं ते म्हणाले.
“मी १९६७ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या ८-१० वर्षांपासून मी संसदेचा सदस्यही नाही. वर्किंग कमिटीमधूनही मला बाहेर काढण्यात आलंय. होय मी काँग्रेसमध्ये आहे. परंतु माझा कोणताही संपर्क नाही. कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याशी संपर्क केला जात नाही. पक्षाशी माझं नातं जवळपास नसल्यासारखंच आहे,” असं कर्ण सिंग म्हणाले.
कर्ण सिंग हे १९६७ ते १९७३ पर्यंत केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय दिसत नाहीत. गुलाम नबी आझाद यांच्याप्रमाणेच कर्ण सिंग यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं नातं आहे. नुकतंच त्यांनी एक पुस्तकही लिहिलं होतं. त्याचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं होतं. त्यांनी आपल्या पुढील प्रवासाबद्दल आता वक्तव्य केलं नसलं, तरी ते काँग्रेसपासून नाराज असल्याचे संकेत मिळत आहेत.
I had joined Congress in 1967. But in last 8-10 yrs, I'm no more in Parliament, I was dropped from working committee. Yes, I'm in Congress but there's no contact, nobody asks me anything.I do my own work. My relations with party are almost zero now: Sr Congress leader Karan Singh pic.twitter.com/xa8re5ZFKh
— ANI (@ANI) September 16, 2022
गुलाम नबी आझाद यांनीही सोडली साथ
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर आपला पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. ते सातत्यानं रॅली करत असून ते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा येऊ शकत नाही, असंही ते यापूर्वी म्हणाले होते.