चुलत बहिणीच्या चितेवर भावाने मारली उडी; चितेशेजारीच भावावरही करावे लागले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:13 AM2022-06-14T08:13:02+5:302022-06-14T08:14:20+5:30
सागर : चुलत बहिणीच्या मृत्यूमुळे शाेकाकुल झालेल्या एका तरुणाने तिच्या चितेवरच उडी घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ...
सागर :
चुलत बहिणीच्या मृत्यूमुळे शाेकाकुल झालेल्या एका तरुणाने तिच्या चितेवरच उडी घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दाेन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
करण ठाकूर असे या तरुणाचे नाव आहे. सागर जिल्ह्यातील मझगुवा गावात राहणारी त्याची २१ वर्षीय चुलत बहीण ज्याेती ठाकूर हिचा विहिरीत बुडून मृत्यू झाला हाेता. ती गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता हाेती. भाजी आणण्यासाठी शेतात गेलेली मुलगी परत आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शाेध घेतला. दुसऱ्या दिवशी शंका आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतातील विहिरीत शाेध घेतला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर शुक्रवारी दुपारी तिचा मृतदेह आढळला. यासंदर्भात तातडीने पाेलिसांना माहिती देण्यात आली.
शुक्रवारी सायंकाळी ज्याेतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी चितेजवळ करण जळालेल्या अवस्थेत काही जणांना दिसून आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला हाेता. ज्याेतीच्या चितेजवळच त्याच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले.
४३० किमी माेटारसायकल चालवून पाेहाेचला गावात
ज्याेतीच्या मृत्यूची माहिती मिळताच शाेकाकुल झालेला करण तब्बल ४३० किलाेमीटर अंतरावरून माेटरसायकलने शनिवारी सकाळी गावी पाेहाेचला. बहिणीची चिता पाहून दु:खाच्या आवेगात त्याने स्वत:ला त्यात झाेकून दिले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.