लोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील सुरक्षा स्थिती चांगली राहिल्यास पुढील वर्षी एप्रिल किंवा मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींचाही पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. तिन्ही निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय पक्षांबरोबरच प्रशासनानेही यासाठी सक्रियता वाढवली आहे.
निवडणूक आयोगाने पुढील आदेशापर्यंत मुख्य निवडणूक अधिकारीपदाचा कार्यभार संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी अनिल सालगोत्रा यांच्याकडे सोपवला आहे. पंचायत मतदार याद्या तयार करण्याचे कामही पुढील आठवड्यापासून जिल्हास्तरावर सुरू होणार आहे. अशा स्थितीत राज्यात तीन मोठ्या निवडणुकांची तयारी केली जात आहे.