- हरीश गुप्ता, नवी दिल्लीसंपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या महिन्यात पुण्यातील घोडे व्यापारी हसन अली यांच्याशी संबंधित करचोरी आणि हवाला व्यवहाराबद्दलच्या प्रकरणांच्या फायली पुन्हा उघडल्या होत्या आणि आता दिल्लीतील मांस निर्यातदार मोईन अख्तर कुरेशी हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.ईडीने पुन्हा एकदा हसन अलींच्या पुणे आणि अन्य शहारांमधील प्रतिष्ठानांवर छापे घातले आहेत. ईडीचे संचालक कर्नल सिंग यांनी ईडीच्या प्रादेशिक प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांच्या फायलींवरील धूळ झटकण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच अनेक काँग्रेस नेत्यांसोबत निकटचे संबंध असलेले मोईन अख्तर कुरेशी यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचा निर्णय आयकर विभाग आणि ईडीने घेतल्याचे समजते. आयकर विभागाने करचोरीच्या संदर्भात दंड आकारण्याबाबतची नोटीस जारी केली होती; परंतु नंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कुरेशी यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही.
हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे
By admin | Published: March 25, 2016 2:11 AM