ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 29 - शहरात वाढलेल्या तापमानात मान्सूनपुर्व पावसामुळे घट झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला. मात्र या पावसाने एकीकडे दिलासा दिला असताना तलावाशेजारी राहणा-यांच्या समस्या मात्र वाढवल्या आहेत. शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बर्फवृष्टी होऊ लागली आहे. मात्र ही बर्फवृष्टी केमिकल आहे. पावसामुळे तलावात फेस झाला असून संपुर्ण रस्त्यावर तो पसरत आहे. जवळच राहणा-यांना तर आपण ढगात असल्यासारखं वाटत असावं इतका फेस या तलावातून निघत आहे. रस्त्यावरुन जाणा-या गाड्यांनाही या फेसामुळे त्रास होत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तलाव फेसाळल्यामुळे शहरातील रस्त्यांवर जणू काही बर्फवृष्टीच होत आहे असं चित्र पाहयला मिळत आहे. मात्र ही बर्फवृष्टी दूषित रसायनांमुळे तयार झालेल्या फेसाने होत असल्याने स्थानिक चिंतेत आहेत. हा फेस बंगळुरुतील रस्त्यांवर पसरला आहे. मुसळधार पावसानंतर बंगळुरुतील रस्त्यांवर दूषित रासायनिक फेसाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे.