नवी दिल्ली- ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.ईशान्येकडील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला निवडणुकांत यश मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. 3 मार्च रोजी ईशान्येकडील तीन राज्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालाच्या जवळपास 48 तासांनंतर राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या ट्विटची अनेक जण आतुरतेनं वाट पाहत होते. तसेच ईशान्येकडील नेते काँग्रेसचा झालेल्या पराभवावर टिप्पणी करण्यास धजावत नव्हते. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. तर मेघालयातही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिलं आहे.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीच जाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तर मेघालयातही ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन 34 आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
ईशान्येकडील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अखेर राहुल बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 5:42 PM