नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला कर्नाटक वगळता दक्षिणेत यश मिळालेले नाही. परंतु, अलीकडेच तेलंगणामध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत विजय मिळवून तेलंगणा राष्ट्र समितीच्या गडामध्ये भाजपने चंचूप्रवेश केला हाेता. आता हैदराबादमध्ये पक्षाने मुसंडी मारली आहे. आता पुढील आठवड्यात ८, १० आणि १४ डिसेंबरला केरळमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. या निमित्ताने केरळच्या सत्ताकरणात प्रवेश करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.केरळमध्ये भाजपने ५०० ख्रिश्चन आणि ११२ मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे. एवढेच नव्हे तर गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ त्यांच्यासाठी प्रचार करतांना दिसणार आहेत. यंदा तिरुवनंतरपुरम महापालिकेकडे लक्ष राहणार आहे.
अल्पसंख्याकांना संधीकेरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदाय मिळून सुमारे ४५ टक्के मतदार आहेत. तर ५५ टक्के हिंदू मतदार आहेत. राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाय घट्ट राेवले आहेत; परंतु सत्तेचा राजमार्ग ५५ टक्के हिंदू मतदारांच्या जाेरावर मिळणार नाही हे भाजपचे नेते जाणून आहेत. त्यामुळे भाजपने साेशल इंजिनिअरिंगचा प्रयाेग केला आहे.