नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहम्मद अली जिना यांच्याप्रमाणेच असदुद्दीन ओवेसीही भारताची दुसरी फाळणी करतील, असं विधान गिरिराज सिंह यांनी केले आहे. तसेच, असदुद्दीन ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात असा आरोप गिरीराज सिंह यांनी केला आहे.
गिरीराज सिंह हे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात. शुक्रवारी गिरिराज सिंह म्हणाले की, ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. जिना यांच्यानंतर ओवेसी भारताच्या दुसऱ्या फाळणीचे नेतृत्व करतील. भारताच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात राहिले. या दोन्ही देशांमध्ये त्यांच्यासोबत अनेक घटना घडल्या, पण ओवेसी यांनी या गोष्टीचा कधी निषेध केला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश असता तर ओवेसींचा आवाज आतापर्यंत दाबला गेला असता, असे गिरीराज सिंह म्हणाले.
एनआरसी (NRC) मुद्द्यावरून गिरीराज सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा आपण एनआरसीबद्दल बोलतो तेव्हा राहुल गांधी विरोध करतात. मात्र, हिमाचलमधील काँग्रेस सरकार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभागृहात काँग्रेसचे मंत्री म्हणत आहेत की, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना त्याचे सर्टिफिकेट दिले पाहिजे, म्हणजेच एनआरसी असायला हवे. तसेच, एनआरसी फक्त बिहारमधील ४ जिल्ह्यांनाच नाही तर संपूर्ण बिहार आणि देशात आवश्यक आहे. एनआरसी लागू केले नाही, तर भारतीयांचा नाश होईल, असेही गिरीराज सिंह यांनी सांगितले.
याचबरोबर, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, काँग्रेस सरकारने आपल्या राजवटीत वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन बळकावण्याचा अधिकार दिला होता. याचे पुरावे हिमाचल प्रदेशचे मंत्री विधानसभेत देत आहेत. तसेच, वक्फ बोर्डाची मालमत्ता कशी वाढत आहे? असा सवाल करत रेल्वे विभागाचे अनेक प्रकल्प रोखण्यात आले, कारण वक्फ बोर्डाने ही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाची गुंडगिरी थांबली पाहिजे, असेही गिरीराज सिंह म्हणाले.