नवी दिल्ली - मध्यप्रदेशात मागील 17 दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्या आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसनेते कमलनाथ यांनी आपला मुख्यमंत्रीदाचा राजीनामा राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सोपविला आहे. त्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता खुला झाला आहे. कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
ट्विट करून ज्योतिरादित्य यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील जनतेचा आज विजय झाला. मला नेहमीच वाटते की, राजकारण हे जनतेच्या सेवेचे माध्यम असायला हवं. मात्र मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार यापासून दूर गेले होते. सत्याचा पुन्हा विजय झाल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले.
मध्य प्रदेशात फ्लोअर टेस्टच्या आधीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा राज्यापालांकडे सोपविला. त्यानंतर त्यांनी भाजपवर सरकार अस्थिर करण्याचा आरोप केला आहे. भाजपाने २२ आमदारांचे अपहरण केले होते, हे देशच बोलत आहे. करोडो रुपये खर्च करून हा खेळ खेळला गेला. एक महाराज आणि त्यांच्या २२ सहकाऱ्यांनी मिळून कट रचला. काही काळानंतर यातील सत्य बाहेर येईल, असा आरोप त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव न घेता केला.