गुलाम नबी आझाद यांचा कपिल सिब्बलांना पाठिंबा; सोनिया गांधीना पत्र लिहून केली महत्त्वाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 09:30 AM2021-09-30T09:30:22+5:302021-09-30T09:37:44+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, यात एक महत्त्वाची मागणी केली आहे.
नवी दिल्ली:काँग्रेस पक्षात आताच्या घडीला मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यपदी नियुक्ती केलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. एकीकडे निवडणुका उंबरठ्यावर असताना दुसरीकडे काँग्रेसमधील कलह पक्षासाठी चिंता वाढवणार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, यात एक महत्त्वाची मागणी केली आहे. यासह आझाद यांनी कपिल सिब्बल यांना पाठिंबा दर्शवला आहे. (after kapil sibal congress ghulam nabi azad letter to sonia gandhi demanding for cwc meeting)
नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेतल्याने नवा अध्यक्ष नेमावा का, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असतानाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काँग्रेस नेते हबकून गेले आहेत. ते भाजपला मदतच करतील, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
गुलाम नबी आझाद यांचे सोनिया गांधींना पत्र
कपिल सिब्बल यांनी दिल्लीत माध्यमांशी चर्चा करताना काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलावावी, अशी मागणी करत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्षच नसताना निर्णय कोण घेतो, अशी विचारणा केली. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, त्यांनीही काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल दोघेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, ते त्या २३ नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांना पत्र लिहीत काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली होती. या नेत्यांच्या गटाला जी-२३ असेही संबोधले जाते.
पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने निर्नायकी स्थिती
काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्नायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पक्षाचे आणखी एक नेते मनीष तिवारी यांनीही अशाच आशयाचे विधान केले होते. अमरिंदर यांचा राजीनामा घेताना, नवा मुख्यमंत्री ठरवताना पक्षात चर्चा झाली नाही, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जणांनी पदे सोडली, पण पक्ष गप्पच आहे. अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची लगेच बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंदिया, जितीन प्रसाद, सुष्मिता देव, केरळचे व्ही. एम. सुधीरन यांनी पक्ष सोडूनही श्रेष्ठींना जाग आली नाही, अशी टीकाही सिब्बल यांनी केली असून, राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर ते पद त्यांना दिल्यास मुख्यमंत्री अशोक गेहलोत व त्यांचे समर्थक बंड करतील, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी काँग्रेसची पार कोंडी झाली आहे, असेही ते म्हणाले.