केरळनंतर आता दिल्लीचेही नाव बदलणार? भाजप खासदाराचे अमित शहा यांना पत्र, केली या नावाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:50 IST2026-02-25T12:50:14+5:302026-02-25T12:50:24+5:30
Delhi Renaming News : नवी दिल्लीचे नाव बदलून 'इंद्रप्रस्थ' करण्याची मागणी भाजप खासदार राजीव खंडेलवाल यांनी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी दिल्लीच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला आहे.

केरळनंतर आता दिल्लीचेही नाव बदलणार? भाजप खासदाराचे अमित शहा यांना पत्र, केली या नावाची मागणी
केंद्र सरकारने कॅबिनेट बैठकीत केरळ राज्याचे नाव केरळम करण्यावर शिक्कामोर्तब केले आणि आता दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांच्या नामांतराची चर्चा सुरु झाली आहे. प्रस्ताव पाठविलेला असूनही प. बंगालचे नाव बदलण्यात आले नाही यावरून ममता यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर दिल्लीचे नाव बदलण्यासाठी भाजप खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्र पाठविले आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या नामांतराची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दिल्लीचे प्राचीन वैभव आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शहराचे नाव बदलून 'इंद्रप्रस्थ' करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप खासदार राजीव खंडेलवाल यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले असून, या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे खासदारांची मागणी?
खासदार राजीव खंडेलवाल यांच्या मते, दिल्लीचा संबंध पौराणिक काळातील 'इंद्रप्रस्थ' नगरीशी आहे. महाभारतात पांडवांनी वसवलेली ही नगरी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. 'दिल्ली' हे नाव परकीय आक्रमकांच्या खुणा दर्शवते, त्यामुळे ते बदलून भारताच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेले 'इंद्रप्रस्थ' हे नाव अधिक सयुक्तिक ठरेल, असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
पांडवांची राजधानी ते आधुनिक दिल्ली
दिल्लीत आजही 'पुराना किला' परिसरात उत्खननादरम्यान इंद्रप्रस्थाचे अवशेष सापडल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. अनेक संघटना आणि नागरिकांकडून सातत्याने दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी होत होती. आता थेट सत्ताधारी पक्षाच्या खासदारानेच गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याने केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.