नवी दिल्ली-
लडाख सेक्टरमध्ये के-९ वज्र हॉवित्जर (K-9 Vajra Howitzers) यशस्वीपणे तैनात आणि परिक्षण केल्यानंतर भारतीय लष्कर आता चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) मध्य-पूर्व क्षेत्रात उंच पर्वतरांगांमध्ये के-९ वज्र हॉवित्जर तैनात करण्याची योजना आखत आहे. भारतीय लष्करानं गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये सीमेवर लडाखच्या पूर्व भागात भारतात तयार करण्यात आलेल्या तोफांना तैनात केलं होतं. या ठिकाणी तोफा अतिशय प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं होतं.
सरकारी सुत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार तोफांचं यशस्वी परिक्षण झालं आहे. आता अशापद्धतीच्या आणखी २०० हॉवित्जरची ऑर्डर देण्याची तयारी लष्करानं केली आहे. या सर्व हॉवित्जर तोफा उत्तराखंडसह मध्य क्षेत्रातील उंचीच्या ठिकाणी तसंच सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशसह पूर्व क्षेत्रात तैनात करण्यात येणार आहेत. हॉवित्जरची कामगिरी अतिशय उत्तम ठरली आहे आणि पर्वतरागांमध्ये भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी जानेवारी २०२० मध्ये लष्कराला सोपवलं होतं के-९ वज्र हॉवित्जरभारतीय लष्करातील सर्वात शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या वर्ज हॉवित्जर या रणगाड्यांना १९ जानेवारी २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय लष्करात सुपूर्द करण्यात आले होते. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गरज पडल्यास शत्रुंना जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी हॉवित्जर रणगाडे मोठी कामगिरी पार पाडतील असा विश्वास त्यावेळी नरेंद्र मोदींनी व्यक्त केला होता. बहुउद्देशीय के-९ वज्र हॉवित्जरची गुजरातच्या सुरत येथे निर्मिती करण्यात आली आहे.