नवी दिल्ली - गाजलेल्या चारा घोटाळ्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून साडे तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र लालू यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी एवढ्यावरच संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आता लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांवर निनावी मालमत्ते प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात कारवाईची टांगती तलवार आहे. प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात निनावी मालमत्तेप्रकरणी विस्तृत डॉजिएर तयार केले आहे. निनावी मालमत्तेच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि दोन मुलींविरोधात रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांच्या दोन बहिणींविरोधात दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये बेहिशोबी कमाईतून 40 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी खटला सुरू आहे. प्राप्तिकर विभागाने ही संपत्ती याआधीच जप्त केली आहे. निनावी संपत्ती प्रकरणी दोषी ठरवण्यात आल्यास तेजस्वी यादव आणि त्यांच्या बहिणींना सात वर्षे कारावास आणि या मालमत्तेच्या बाजारभावाच्या 25 टक्के रक्कम दंड होऊ शकतो. दरम्यान, चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात येथील सीबीआय विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शनिवारी साडेतीन वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्यात लालूंना झालेली ही दुसरी शिक्षा आहे. जामिनासाठी त्यांना आता झारखंड उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.या खटल्यात लालूंसह १६ आरोपींना २३ डिसेंबर रोजी दोषी ठरविण्यात आले होते. न्या. शिवपाल सिंग यांनी शनिवारी दुपारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’ माध्यमाने शिक्षा सुनावली. लालूंना भारतीय दंड विधान व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये सर्व मिळून साडेतीन वर्षांचा कारावास देण्यात आला. काय आहे चारा घोटाळापूर्वी बिहारमध्ये व आता झारखंडमध्ये असलेल्या देवघर येथील सरकारी तिजोरीतून, सन १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले बनवून फसवणुकीने ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याच्या संदर्भात हा खटला होता. प्रत्यक्षात चाºयाचा पुरवठा न करताच कंत्राटदारांच्या नावे असे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही मुख्यमंत्री या नात्याने लालूंनी त्याकडे कानाडोळा केला, असा त्यांच्यावर आरोप होता. या घोटाळ्याच्या एकूण ३३ खटल्यांपैकी सहा खटल्यांमध्ये लालू प्रसाद आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे. अन्य चार खटल्यांचे कामकाज याच न्यायालयात सुरू आहे. याआधी चैबासा तिजोरीतून झालेल्या ३७.५ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद व २५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा झाली होती.सन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लालूंना त्या खटल्यात जामीन दिला. पण शिक्षेला स्थगिती न दिली गेल्याने त्यांना ११ वर्षे कोणतीही निवडणूक न लढण्याची अपात्रता लागू झाली. नव्या शिक्षेने त्यांच्या अपात्रतेचा कालावधी आणखी सहा वर्षांनी वाढेल. गेले दोन आठवडे लालू बिरसा मुंडा कारागृहात आहेत.
लालूंच्या तुरुंगवासानंतर आता कुटुंबीयांवर निनावी मालमत्तेप्रकरणी कारवाईची टांगती तलवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 10:40 AM