हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेक ठिकाणांवरून जीवीतहामीचे वृत्त येत आहे. सोलनमध्ये भूस्खलनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता आहेत. राजधानी शिमला येथेही भूस्खलनामुळे मोठी दूर्घटना घडली आहे. येथील समरहिलमधील शिव मंदिरावर दरड कोसळली आहे. या घटनेत किमान २५-३० लोक ढिगाऱ्याखाली दबले असून 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे.
समरहिल येथील घटनेत प्राचीन शिव बाडी मंदिर उध्वस्त झाले आहे. या दूर्घटनेत जवळपास दोन डझन लोक दबल्याची शक्यता आहे. यात एक कुटुंबातील सात लोकांचा समावेश आहे. मदत आणि बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले असून यात दोन लगान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय पाच जखमींनाही बाहेर काढण्यात आले आहे. शिमल्याचे डीसी आदित्य नेगी आणि एसपी संजीव गांधी घटनास्थळी उपस्थित असून रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. हे मंदिर पाहाडाच्या पायथ्याशी आहे. पहाडावरून वारंवार भूस्खलन होत असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. ही भूस्खलनाची घटना सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास घडली. आज सोमवार असल्याने शिव शंकरांच्या मंदिरात भावीक दर्शनासाठी आले होते. याच दरम्यान मंदिरावर दरड कोसळली. शिमल्याचे एसपी संजीव गांधी यांनी म्हटल्यानुसार, घटनास्थळी तीन मृतदेह सापडले आहेत. मदतकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेले आहेत. ते काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले आहे.