हैदराबाद - 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता नवनवी समीकरणे उदयास येऊ लागली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी नव्या जुन्या मित्रांना आपल्या बाजूने खेचण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपाला लोकसभा निवडणुकीनंतर अजून एक मित्र पक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी करत असलेले चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती पक्ष आणि भाजपामध्ये निवडणुकीनंतर युती करण्याबाबत सहमती बनताना दिसत आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगाणा राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे एक तास चाललेल्या या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राव यांच्यात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली. या चर्चेवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी करणे आपल्या पक्षासाठी फायद्याचे ठरणार नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपाला गरज पडली तर आघाडीसाठी तयार आहोत, असे राव यांनी सांगितले. भाजपा आणि टीआरएसमध्ये जवळीक वाढत असली तरी तेलंगाणामध्ये भाजपाला शिरकाव करू देण्यास टीआरएस तयार नाही. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा प्रस्ताव पक्षाने फेटाळला आहे. तेलंगाणामध्ये विजयी ठरण्यासाठी पात्र उमेदवार भाजपाकडे नाहीत असे टीआरएसचे मत आहे. त्यामुळे पाच ठिकाणी भाजपाला टीआरएस मदत करू शकते. दरम्यान, तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असलेल्या टीआरएसचे विविध प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पुढील समीकरणे जुळवण्यासाठी भाजपाला टीआरएस उपयुक्त ठरतील.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा मित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 12:36 PM