लुधियाना (पंजाब) : लुधियानातील ‘पन्नासिंग पकोडावाला’ या प्रसिद्ध पकोडा केंद्रावर आयकर विभागाने छापा मारल्यामुळे खळबळ निर्माण झाल्याची घटना ताजी असतानाच आता पटियालातील एक भेळवाला चांगलाच चर्चेत आला आहे. आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात पटियालातील लोकप्रिय भेळवाल्याकडे तब्बल एक कोटी 20 लाखांची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी आयकर विभागाने मारलेल्या छापेमारीत भेळवाल्याच्या अघोषित संपत्तीची माहिती समोर आली आहे.
आयकर विभागाने भेळवाला असलेल्या परिसरात छापेमारी सुरू केली होती. त्यामध्ये भेळवाल्याने तब्बल 1 कोटी 20 लाखांची संपत्ती लपवून ठेवल्याचं समजलं. भेळवाला हा कॅटरर्सचही काम करतो. तसेच त्याने इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल केला नसल्याची माहिती ही आता समोर आली आहे. मात्र आता भेळवाल्याच्या अघोषित संपत्तीची माहिती समोर आल्यानंतर त्याला जवळपास 52 लाखांचा कर भरावा लागणार आहे.
आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भेळवाल्याने दोन पार्टी हॉल बांधले होते. तसेच एखाद्या समारंभासाठी जवळपास 2.5 ते 3 लाख तो लोकांकडून आकारत असे. अधिकाऱ्यांच्या मते भेळवाल्याच्या व्यवसायाची लिखित माहिती नसल्याने त्याच्या एकूण संपत्तीचा सध्या तपास सुरू आहे. त्यामुळेच त्याला भराव्या लागणाऱ्या कराच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच लवकराच लवकर भेळवाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयकर विभागाने दिली.