मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता या राज्यात काँग्रेसला तगडा धक्का बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:21 AM2020-07-14T11:21:43+5:302020-07-14T11:25:18+5:30

पक्षश्रेष्ठींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असून, येथीली माजी खासदार तसेच काही माजी मंत्री योग्य संधी आणि वेळेची वाट पाहत आहेत.

After Madhya Pradesh and Rajasthan, the Congress is now likely to face a major blow in this state | मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता या राज्यात काँग्रेसला तगडा धक्का बसण्याची शक्यता

मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता या राज्यात काँग्रेसला तगडा धक्का बसण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच आता दिल्लीमध्येही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे समोर आले आहे प्रभावी नेतृत्वाचा अभाव असलेल्या काँग्रेसची दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दाणादाण उडाली होती. दिल्लीतील पालिका निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वी पालिका राजकारणातील काँग्रेसचे बडे नेते आपची वाट धरण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली - देशाच्या सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला सध्या एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधील सत्ता बंडखोरीमुळे गमवावी लागल्यानंतर सध्या काँग्रेसमोर राजस्थानमधील सत्ता टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच आता अजून एका राज्यामध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच आता दिल्लीमध्येही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे समोर आले आहे. पक्षश्रेष्ठींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसचे अनेक नेते नाराज असून, येथीली माजी खासदार तसेच काही माजी मंत्री योग्य संधी आणि वेळेची वाट पाहत आहेत. तर दिल्लीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनेक नेते पुढच्या काही काळात काँग्रेसचा हात सोडून अन्य कुठल्याही पक्षात देरेदाखल होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भातील वृत्त दैनिक जागरणने प्रसारित केले आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दिल्यानंतर दिल्लीत कमकुवत झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात उत्साह आला होता. त्याचा परिणाम २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला होता. त्यावेळी काँग्रेसने दिल्लीतील आपली स्थिती सुधारून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. मात्र शीला दीक्षित यांचे आकस्मिक निधन झाल्याने काँग्रेसला धक्का बसला.

प्रभावी नेतृत्वाचा अभाव असलेल्या काँग्रेसची दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दाणादाण उडाली. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ चार टक्के मते मिळाली. दरम्यान, सध्या युवा नेते अनिल चौधरी यांच्याकडे प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप आपला प्रभाव पाडता आलेला नाही.

अशा परिस्थितीत दिल्लीतील सर्व नामांकित माजी आमदार, मंत्री आणि माजी खासदार आगामी राजकीय वाटचालीबाबत मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांच्याकडून योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दिल्लीतील पालिका निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी आहे. तत्पूर्वी पालिका राजकारणातील काँग्रेसचे बडे नेते आपची वाट धरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या सुरात सूर मिसळून दिल्ली काँग्रेसमध्ये सारे काही  आलबेल नसल्याचे संकेत दिले आहे. सध्या पक्षातून निलंबित असलेले महाबल मिश्रा यांनी पक्षामध्ये वरिष्ठांकडून ज्येष्ठ नेत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगितले. कुणाच्याही तक्रारी किंवा समस्या ऐकून घेतल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले.  

Web Title: After Madhya Pradesh and Rajasthan, the Congress is now likely to face a major blow in this state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.