महाराष्ट्रात शिवसेनेत अभूतपूर्व बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष आणि धनुष्यबाण निसटला आहे. आता महाराष्ट्रानंतर बिहारमध्येहीनितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाहा यांच्यातील लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पाटणा येथील सिन्हा लायब्रेरीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये उपेंद्र कुशवाहा यांनी आपले निकटवर्तीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून पुढील रणनीतीबाबत मत जाणून घेतले. आता बैठकीच्या दुसऱ्या दिवशी उपेंद्र कुशवाहा दुपारनंतर नव्या पक्षाची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी उपेंद्र कुशवाहा गटातील नेत्यांमध्ये एकमत बनताना दिसत आहे, या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बैठकीच्या आधी सर्व नेत्यांनी आपलं मत मांडलं. त्यात काही नेत्यांनी सांगितलं की, नितीश कुमार यांनी जेडीयूला राजदची बी टीम बनवली आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष बनेल तो बिहारच्या जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करेल. एका अन्य नेत्याने नितीश कुमार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले की, आम्ही राजदची बी टीम म्हणून काम करणार नाही. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयूने आपली ओळख गमावली आहे. आता आम्ही त्यांच्यासोबत काम करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही वेगळ्या पक्षाच्या स्थापनेवर भर देत आहोत. हा पक्ष बिहारच्या जनतेच्या कल्याणासाठी काम करेल.
त्यांनी पुढे सांगितले की, उपेंद्र कुशवाहा यांनी माझ्या मागणीशी सहमती दर्शवली आहे. उपेंद्र कुशवाहा यांनी एक ट्विटदेखील केलं आहे. त्यामध्ये सोमवारी दुपारनंतर ते मौर्या हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलणार असल्याचे सांगण्यात आले. उपेंद्र कुशवाहा यांचे निकटवर्तीय माधव आनंद यांनी सांगितले की, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात काम केले आहे. तसेत नितीश कुमार यांनाही कमीपणा दाखवण्याचं काम केलं आहे. त्यांनी सांगितलं की, काही ज्येष्ठ नेतेच जेडीयूचं राजदमध्ये विलिनीकरण व्हावं यासाठी पक्षाविरोधात काम करत आहेत.
ते म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाला कमकुवत करण्यासाठी कुठलं कारस्थान रचण्यात आलं, हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे. पक्ष आरजेडीमधील विलिनीकरणाच्या बातम्यांचं जाहीरपणे खंडन का करत नाही आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आखिरकार या घटनाक्रमामुळे आता उपेंद्र कुशवाहा हे आता राष्ट्रीय लोकसमता पार्टीला किंवा समता पार्टीला पुन्हा जीवित करतात की, कुठल्या अन्य नाव्याने नव्या पक्षाची घोषणा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तसेच उपेंद्र कुशवाहा यांच्या नेतृत्वात जो पक्ष स्थापन केला जाईल तो एनडीएमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतही उत्सुकता आहे.