Lok Sabha Election 2024 Opinion Poll Bihar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तयार होऊ लागले आहे. राज्याराज्यांचे ओपिनिअन पोलही येऊ लागले आहेत. रविवारी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरून एबीपी-सीव्होटर सर्व्हे आला होता. यात मविआला भाजपप्रणित एनडीएपेक्षा जास्त जागा मिळत असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. तर आता बिहारचा सर्व्हे आला आहे जो भाजपा आणि लालू नितीश या जोडगोळीसाठी देखील धक्कादायक आहे.
भाजपाने गेल्यावेळी नितीशकुमार, लोकजनशक्ति पार्टी (रामविलास) यांच्यासोबत आघाडी केली होती. यावेळी ४० पैकी ३९ जागांवर विजय मिळाला होता. हा आकडा लोकसभेतील बहुमताकडे भाजपाला घेऊन गेला होता. परंतु, आता वारे फिरले आहेत, त्याचा परिणाम ओपिनिअन पोलच्या आकड्यांवरही झाल्याचे दिसत आहे. आता भाजपविरोधात नितीश कुमारांनीच आघाडीची मोट बांधली आहे. लालू प्रसाद यादवांना घेऊन नितीश बिहारच नाही तर देशभरात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी करून लढण्याची तयारी करत आहेत.
बिहारमध्ये भाजपासोबत जीतन राम मांझी यांची हिंदुस्तान आवाम मोर्चा, चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती आणि पशुपति पारस यांचा लोकजनशक्ति पार्टी (पारस गट) आहेत. या वेळच्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला ओपिनिअन पोलमध्ये १६ ते १८ जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच एनडीएला २१ ते २३ जागाचे नुकसान होताना दिसत आहे.
दुसरीकडे नितीश यांच्या इंडिया आघाडीला २१ ते २३ जागा मिळताना दिसत आहेत. अन्यच्या खात्यात ० ते २ जागा दिसत आहेत. या निवडणुकीत एनडीएला ३९ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. तर लालू-नितीश आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीला ४३ टक्के मतदान होताना दिसत आहे. अन्यला १८ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात पोल काय...पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, मविआला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.