बेंगळुरू -इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या रूपाच्या (स्ट्रेन) पार्श्वभूमीवर आता कर्नाटक सरकारही सतर्क झाले आहे. यापासून बचावासाठी आता महाराष्ट्रानंतर कर्नाटक सरकारनेही राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा नाईट कर्फ्यू आजपासून 2 जानेवारीपर्यंत लागू राहील. तसेच तो रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत असेल.
यासंदर्भात बोलताना कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले, की हा (नाईट कर्फ्यू) इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तसेच त्याला रोखण्यासाठी करण्यात आला आहे. आम्ही राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरही लक्ष ठेऊन आहोत.
यावेळी ख्रिसमस उत्सवानिमित्त जल्लोषाची परवानगी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला असता, आरोग्यमंत्री म्हणाले, 23 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान रात्री 10 वाजेनंतर कुठलाही कार्यक्रम अथवा उत्सव साजरा करण्याची परवानगी नसेल. तसेच हा नियम सर्वच कार्यक्रमांसाठी लागू असेल.
कर्नाटक सरकारने यासंदर्भात म्हटले आहे, की "आपल्याला अधिक सावध रहावे लागेल. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळांवरच केली जाईल. तसेच सरकारने इंग्लंड, डेनमार्क आणि नेदरलँड येथून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाइन रहने अनिवार्य केले आहे."