लखनौ - महाराष्ट्र सरकारनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही प्लास्टीक बंदी होणार आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने 15 जुलैनंतर राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची घोषणा केली. बाराबंकी येथे आयोजित केलेल्या वन महोत्सव कार्यक्रमात योगी यांनी प्लास्टीक बंदीबाबतची ही माहिती दिली.
उत्तर प्रदेशमध्ये 15 जुलैनंतर प्लास्टीक बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 15 जुलैनंतर प्लास्टीक कप, ग्लास आणि प्लास्टीक पिशव्यांचा वापर करु नये, असे आवाहन योगींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केले. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आपले शरीर स्वास्थ आणि धरणीमातेला प्रदुषणापासून वाचविण्यासाठी प्लास्टीकचा वापर बंद करणे आवश्यक असल्याचेही योगींनी म्हटले. मात्र, यापूर्वीही अनेकवेळा उत्तर प्रदेशमध्ये प्लास्टीक बंदी करण्यात आली होती. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने नुकताच प्लास्टीक बंदीचा आदेश जारी केला आहे. तर दिल्ली आणि कर्नाटक राज्यातही प्लास्टीक बंदी लागू करण्यात आली आहे.