कोलकाता - केंद्रात सत्ता आल्यापासून भाजपाने आपली सत्ता नसलेल्या राज्यात विविध मार्ग अवलंबत सत्ता आणण्याचा धडाका लावला आहे. २०१९ मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत भाजपाला सत्तेच्या बाहेर ठेवले होते. मात्र गेल्या महिन्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीला बळ देत भाजपाने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले होते. त्यानंतर आता अजून एका राज्य भाजपाच्या निशाण्यावर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिथुन चक्रवर्ती गतवर्षीच भाजपामध्ये दाखल झाले होते. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधील ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामधील २१ आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपाच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपा दंगे करतो असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, असे आरोप करणे हा केवळ एका कारस्थानाचा भाग आहे.
भाजपाला मुस्लिमविरोधी म्हटलं जातं. मात्र असं का म्हणतात, हे मला कळत नाही. आज सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान हे भारतीय चित्रपट सृष्टीतील तीन स्टार आहेत. हे तिघेही मुस्लिम आहेत. मग हे कसं शक्य झालं. भाजपाचं देशातील १८ राज्यांत सरकार आहे. जर भाजपा मुस्लिमांचा द्वेश करत असती तर या राज्यांमध्ये या स्टार्सचे चित्रपट यशस्वी ठरले नसते असा टोला मिथुन चक्रवर्ती यांनी लगावला.