ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 20 - फुटीरवाद्यांकडून काश्मीर खो-यात शुक्रवारी करण्यात येणार आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. शुक्रवारी महाशिवरात्री येत असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. काश्मीर खो-यात दर शुक्रवारी फुटीरवाद्यांनी आंदोलन करण्यात येतं. मात्र महाशिवरात्रीही शुक्रवारीच असल्याने आंदोलन रद्द करण्यात आलं आहे.
'महाशिवरात्री शुक्रवारी येत असल्याची आम्हाला माहिती नव्हती. मात्र जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही तात्काळ यावर चर्चा करत मार्ग काढण्यास सुरुवात केली असल्याचं', सय्यद अली शाह गिलानी यांच्या नेतृत्वातील हुर्रियत प्रवक्ते अयाज अकबर यांनी सांगितलं आहे. 'आमच्या हातात अजून वेळ असून लवकरच आम्ही आंदोलनाची नवीन तारीख ठरवू', असंही ते बोलले आहेत.
इतर पक्षांनीही ज्यामध्ये मिरवेज उमर फारुख यांच्या नेतृत्वातील हुर्रियतने आंदोलनाची तारीख महाशिवरात्रीसोबतच आल्याने काळजी व्यक्त केली असून हिंदूंसाठी आपलं समर्थन जाहीर केलं आहे. 'या मुद्यावर चर्चा सुरु असून लवकरच नवीन तारीख जाहीर करु', असं प्रवक्ते शाहिद-उल-इस्लाम यांनी सांगितलं आहे. आम्ही अद्याप राज्यात कोणताही बंद पुकारलेला नाही अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी पत्रक जारी करुन महाशिवरात्रीला शांततापुर्ण सेलिब्रेशन करत सहयोग करण्याचं आवाहन केलं आहे.