ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगलामध्ये साधारणपणे मनिपूर प्रमाणेच थरकाप उडवणारी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात याच आठवड्याच्या सुरुवातीला काही लोकांनी दोन महिलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी केला. ही घटना बुधवारी घडल्याचे बोलले जात आहे. घटनेचा एक कथित व्हिडिओ BJP आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शनिवारी सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिलांना लोक मारहाण करताना दिसत आहे.
अमित मालवीय यांचा TMC वर निशाणा - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी संबंधित महिला मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील बाजारात आपले सामान विकण्यासाठी गेल्या होत्या आणि लोकांना त्यांच्यावर चोरी केल्याचा संशय होता. मालवीय यांनी ट्विट केले की, "पश्चिम बंगालमध्ये दहशत सुरूच आहे. मालदातील बामनगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकुआ हाट भागात दोन आदिवासी महिलांना विर्वस्त्र करण्यात आले, त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. यावेळी पोलीस मूकदर्शक होऊन केवळ उभे होते. ही भयंकर घटना 19 जुलैच्या सकाळी घडली होती."
एवढेच नाही, तर "संबंधित महिला सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील होत्या आणि एक उन्मादी समूह त्यांच्या जीवावर उठला होता. यात मोठी दूर्घटनाही घडण्याची शक्यता होती. ज्यामुळे ममता बनर्जी यांचे हृदय कळवळायला हवे होते आणि केवल आक्रोश व्यक्त करण्याऐवजी त्यांनी कारवाईही करू शकल्या असत्या. कारण त्या बंगालच्या गृहमंत्रीही आहेत," असेही मालवीय यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माध्यमांसोबत बोलताना राज्याच्या महिला व बाल आरोग्य मंत्री शशी पांजा म्हण्याला, संबंधित महिला आपसात भांडत होत्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर या महिला स्वतःहूनच तेथून निघून गेल्या.