महसाणा - गुजरातच्या महसणा जिल्ह्यात एक विचित्रच प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर, 23 वर्षीय महिलेनं आपल्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, पतीने लग्नापूर्वी आपली जात लपवल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. लग्नापूर्वी पतीने आपली जात ब्राह्मण असल्याचे सांगितले. पण, लग्नानंतर आपला पती ब्राह्मण नसल्याचे उघड झाले आहे.
मेहसणा जिल्ह्याच्या बेचराजी तालुक्यातील एका आदिवाडा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित एकता पटेल यांनी पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे. 23 एप्रिल रोजी माझे ज्या व्यक्तीसोबत लग्न झाले. त्यावेळी त्याने स्वत:चे आडनाव मेहता सांगत मी ब्राह्मण असल्याचे म्हटले. मात्र, लग्नानंतर नोंदणी करताना आपला पती ब्राह्मण नसून त्याचे आडनाव खमार असल्याचे पीडित महिलेला समजले. त्यानंतर, तिने पोलिसात धाव घेत पतीविरुद्द तक्रार दाखल केली आहे.
एकताने गतवर्षी एम.कॉमची परीक्षा पास केल्यानंतर एका खासगी गॅस एजन्सीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी या एजन्सीच्या मालकीण ज्योत्सना मेहता यांनी एकताला अकाऊंटंट म्हणून 5 हजार रुपये महिना पगाराची नोकरी दिली. या नोकरीत असतानाच ज्योत्सना यांचा मुलगा यश याच्याशी एकताची ओळख झाली. त्यानंतर, दोघांनी प्रेमातून एक पाऊल पुढे टाकत लग्न करण्याचा विचार केला. त्यावेळी, मी ब्राह्मण असल्याचे यशने एकताला सांगितले होते. त्यामुळे 23 एप्रिल रोजी हिंदू रितीरिवाजानुसार दोघांनीही लग्न केलं. मात्र, लग्नानंतरची नोंदणी करताना यशने फसवल्याचे एकताच्या लक्षात आले.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, लग्नानंतर आम्ही घरी सेटल झालो, तेव्हा यशचे आडनाव खमार असल्याचे मला लक्षात आले. त्यामुळे मी यशच्या आडनावाची चौकशी केल्यानंतर हे आडनाव ब्राह्मण नसल्याचे मला समजले. यावरुन यशने मला फसवले तसेच माझा विश्वासघात केल्याचे एकताने म्हटले आहे. त्यामुळे एकताने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.