लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची घोषणा होताच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मंगळवारी जबर धक्का बसला. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तसेच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. त्यानंतर, आता युपीतील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आहे. मी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये चांगलं कार्य केलंय. वन, पर्यावरण आणि उद्यानमंत्री म्हणून संबंधित विभागात मोलाचं योगदान दिलं. मात्र, दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश ... परिवर्तन की ओर... असे म्हणत संबंधित मंत्र्याचे राजीनामा पत्र ट्विटरवर शेअर केले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांचा सपात प्रवेश
स्वामी प्रसाद मौर्य यांनी तडकाफडकी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर अखिलेश यादव यांची भेट घेच समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षप्रवेशाची अखिलेश यादव यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यात अखिलेश यादव म्हणाले की सामाजिक न्याय आणि समता-समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत आहे. उत्तर प्रदेशात सामाजित न्यायामध्ये इन्कलाब होईल, २०२२ मध्ये परिवर्तन होईल. दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते पडरौना मतदारसंघातून निवडून आले होते. ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते.