बंगळुरु: सोशल मीडियावर अनेक महिला सध्या मीटू मोहिमेच्या अंतर्गत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुरुषांनी मॅनटू (#ManToo) अभियानाची सुरुवात केली आहे. 15 जणांच्या एका गटानं या आंदोलनाचा श्रीगणेशा केला आहे. यामध्ये फ्रान्सच्या एका माजी राजनैतिक अधिकाऱ्याचादेखील समावेश आहे. पुरुषांवर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. चिल्ड्रन्स राईट्स इनिशिएटिव्ह फॉर शेयर्ड पॅरेंटिंग (क्रिस्प) नावाच्या एनजीओनं मॅनटूची सुरुवात केली आहे. लैंगिक कायदे तटस्थ असावेत, यासाठी 15 जणांचा गट लढा देईल, असं क्रिस्पचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार व्ही. यांनी सांगितलं. #MeToo अभियानाच्या अंतर्गत खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी. कारण खोटे आरोप करणं म्हणजे आंदोलनाचा गैरवापर आहे. कोणालाही जाणूनबुजून अडकवण्यासाठी मीटूचा वापर होऊ नये, असं ते म्हणाले. मॅनटू अभियानाच्या अंतर्गत पुरुष त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवतील, असं कुमार व्ही यांनी म्हटलं. 'मीटू मोहिमेच्या माध्यमातून महिला काही वर्ष किंवा दशकभराआधी झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. मात्र मॅनटूच्या अंतर्गत नुकत्याच घडून गेलेल्या घटनांविरोधात आवाज उठवला जाईल,' असंदेखील ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी मीटू आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रकरणांवरदेखील भाष्य केलं. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी खऱ्या असतील, तर महिलांनी सोशल मीडियावर येण्याऐवजी थेट कायदेशीर कारवाई करावी, असं कुमार व्ही यांनी म्हटलं.
#MeToo नंतर आता #ManToo; पुरुष फोडणार लैंगिक अत्याचारांना वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 9:17 AM