पटणा - बिहारच्या राजकीय मैदानात पुन्हा एकदा रंगत येणार आहे. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव सिंगापूरहून परतल्यानंतर बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची मंगळवारी भेट झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लालू प्रसाद यादव यांनी सर्व आमदार, विधानसभा निवडणूक लढणारे उमेदवार यांची बैठक बोलावली आहे. हा योगायोग आहे की राजकीय नाट्याची नवी पटकथा लिहिली जात आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मंगळवारी मुख्यमंत्री सचिवालयात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट झाली. ही भेट केवळ समोरासमोर झाली नाही तर ती ठरवून झाली होती. बिहारमध्ये माहिती आयुक्त पदावर होणाऱ्या नियुक्तीवर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते भेटले. माहिती आयुक्त नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या समितीत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असतो. परंतु बिहारमध्ये माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीपेक्षा नवीन राजकीय समीकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीनंतर तेजस्वी यादव जेव्हा बाहेर निघाले त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. काही नियुक्त्या बाकी आहेत, त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. सरकार याबाबत माहिती देईल. ६५ टक्के आरक्षण संविधानाच्या नवव्या अनुसूचीत टाकण्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. हा मुद्दा कोर्टात आहे. आम्हीही कोर्टात गेलो आहोत. सरकारने आपली बाजू मांडावी. आम्हीही चांगल्यारितीने बाजू मांडू असं तेजस्वी यादव यांनी सांगितले.
लालू यादव एक्टिव मोडमध्ये...
दुसरीकडे लालू यादव यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. बुधवारी होणाऱ्या या बैठकीला विधानसभा, विधान परिषदेचे आमदार यासह मागील निवडणुकीतील उमेदवारही हजर असतील. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही बैठक बोलावल्याचं बोललं जातं. तेजस्वी यादव १० सप्टेंबरपासून आभार यात्रा काढणार आहेत. लालू प्रसाद यादव ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. त्यासाठीच आजची बैठक बोलवल्याचं सांगितले जाते.