नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाचे सर्व आमदार यावर्षी होळी खेळताना दिसणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी होळी न खेळण्यामागचे कारण स्पष्ट केले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील होळीच्या उत्सवात सामील होणार नसल्याचे म्हटले आहे.
उत्तर-पूर्व दिल्लीत झालेला हिंसाचाराच्या कारणामुळे केजरीवाल आणि त्यांचे आमदार यावर्षी होळी खेळणार नाहीत. नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्या काळात दिल्लीत धार्मिक हिंसा उसळली होती. या हिंसेत 40 हून अधिक लोक मरण पावले. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसेनंतर दिल्ली सरकारने पीडितांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर कोरोना व्हायरसचा असलेला धोका आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर होळी मिलन कार्यक्रमात सहभाग घेणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेऊ नये. त्यामुळे आपण यावेळी होळी मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नाही.